कोरोना वॉरिअर्सच्या मदतीसाठी सरसावले ‘धाकले’ ठाकरे; 1000 पीपीई किट्स, मास्कची मदत


मुंबई : संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट घोंघावत असून जगभरातील अनेक देशांमध्ये या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सारख्या रामबाण उपायाचा वापर केला जाता आहे. अनेक देशांप्रमाणे आपल्या देशातही सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यातच या संकटावर मात करण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गज लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. काहींनी पैशांच्या स्वरूपात तर काहींनी वस्तू स्वरूपातील मदत जाहीर केली आहे. अशातच राज्यातील कोरोना फायटर्सच्या सुरक्षेसाठी असलेल्या पीपीई किट्सचा तुटवडा असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी ‘मार्ड’ या डॉक्टरांच्या संघटनेला हिच गरज लक्षात घेऊन 1000 पीपीई किट्स, तसेच मास्कची मदत केली आहे. त्यानंतर मार्डच्या वतीने अमित ठाकरे यांचे आभारही मानले आहेत.

अमित ठाकरे यांनी केलेल्या मदतीबाबतची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे. राज ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले की, महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी अमितने 1000 पीपीई किट्स आणि मास्क डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेकडे सुपूर्द केले, त्याबद्दल अमितचे मार्डने आभार मानले. पण हे डॉक्टर्स ज्याप्रमाणे जीवावर उदार होऊन महाराष्ट्राची सेवा करत आहेत, त्याबद्दल माझे कुटुंबच ह्या डॉक्टरांचे आभार मानू इच्छितो.


महाराष्ट्रासह देशात सध्या पीपीई किट्सचा तुटवडा असल्याचे वारंवार समोर येत आहे. तसेच पीपीई किट्ससोबत आवश्यक असणाऱ्या मास्कचादेखील तुटवडा आहे. अशातच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर व्यक्तींनी कोरोना विरोधात लढा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स आणि मास्कचा पुरवठा करत मदत केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह अभिनेत्री विद्या बालन हिनेदेखील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स पुरवले आहेत.

Leave a Comment