अशा मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच


महाराष्ट्रावर ओढावलेले जीवघेण्या कोरोना व्हायरसचे संकट अधिकच गडद होत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे लॉकडाऊनच्या काळात अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्याबद्दल त्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे. त्यात आता मुख्यमंत्र्याचे अभिनेता रितेश देशमुखने देखील ट्विट करुन कौतुक केले आहे.


ट्विट करत रितेशने म्हटले आहे की, आपण सगळे सध्या एका वेगळ्याच संकटाचा सामना करत आहोत. केवळ कोरोना व्हायरसचा आपण सगळे सामना करत आहोत, असे नाही तर त्याचसोबत लोकांमध्ये भीती, निराशा, अनिश्चितता देखील आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या काळात आपल्याशी नेहमी संवाद साधत आहेत. आपल्या मनातील शंकांचे ते निरसन करत आहेत. त्याचबरोबर आपल्या मनातील भीती देखील दूर करत आहेत. त्यांचे यासाठी करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

कोरोनाचे संकट आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत आहेत. ते वेळोवेळी नागरिकांना न घाबरता या संकटाचा सामना करण्यासाठी घरात बसून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. त्यांनी काल, रविवारी देखील नागरिकांशी संवाद साधला. राज्यात सर्व धर्मियांनी देशकर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेला प्राधान्य दिले असून सगळे सण घरीच साधेपणाने साजरे केले आहेत, याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो, असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना रमझानच्या काळात रस्त्यावर, मशिदीत एकत्र प्रार्थना (नमाज) न करता ती घरातल्या घरात करण्याचे आवाहन केले होते.

आपली आजच्या परिस्थितीत संयम हीच शक्ती आहे तर आपल्या स्वास्थ्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी,सफाई कामगार पोलीस हेच आपले देव आहेत, त्यांचा आदर ठेवणे हीच आपल्यासाठी देवभक्ती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले होते.

Leave a Comment