पुण्यात रात्रभरात 55 नव्या रुग्णांची वाढ, कोरोनाग्रस्तांची संख्या 1319 वर


पुणे : पुणे जिल्ह्यात काल रात्रभरात आणखी 55 कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अवघ्या 12 तासात 1319 वर पोहोचला आहे. तर जिल्ह्यातील 77 जणांनी आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे, तर 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

काल दिवभरात पुणे जिल्ह्यात 80 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1264 झाली होती. पण त्यानंतर रात्रभरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 55 ने वाढल्यामुळे सकाळी 9 वाजेपर्यंत पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1319 वर पोहोचली.

पुणे जिल्ह्यातील बहुतांश कोरोनाग्रस्त हे शहरातील असून आता नव्याने नोंद झालेले कोरोनाबाधित हे हडपसर, भवानीपेठ, कसबा पेठ, येरवडा या क्षेत्रातील आहे. एकमेकांच्या संपर्कातूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. कारण येथे बैठी घरे तसेच झोपडपट्ट्या असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होत नाही. मागील आठवड्यात महापालिकेने येथील लोकांची सोय मनपा शाळांमध्ये केली होती.

दरम्यान राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आठ हजारांच्या पार गेला असून त्यात मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरे कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला आहे.

Leave a Comment