दीर्घ काळासाठी आपल्यात कोरोना राहणार त्यानुसार पुढील धोरणे ठरवा


नवी दिल्ली : आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. मोदींची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोना विषयावर ही चौथी व्हिडीओ कॉन्फरन्स होती. काही राज्यांना बोलण्याची संधी प्रत्येक कॉन्फरन्समध्ये मिळाली. मागील वेळेस जी राज्ये राहिली होती त्यांच्या मुख्यमंत्र्यांना आज कोरोनाविषयक त्यांच्या राज्यात काय काय उपाययोजना सुरु आहेत ते सांगण्याची संधी मिळाली.

दरम्यान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोना हा दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार असल्यामुळे आपण आपली धोरणे त्यानुसार ठरवा, असे सांगितले आहे. प्रत्येक राज्याने आपल्या राज्यात लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते विचार करून ठरवायचे आहे. त्याचबरोबर ‘सोशल डिस्टनिंग’ हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. तसेच आपल्या जीवनात खूप काळासाठी मास्क, फेसकव्हर हे देखील राहणार आहेत हे देखील लक्षात घ्या. लॉकडाऊन असूनही जीवन सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनवा, असे देखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी यावेळी म्हणाले की, आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा आहे, त्याचबरोबर आर्थिक व्यवहार देखील गतीने सुरु करायचे आहेत. कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे 20 देश यामध्ये भारताबरोबर होते. आज 7 ते 8 आठवड्यांनी भारताच्या तुलनेत या देशांमध्ये 100 पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. कितीतरी मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत. योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली, जनतेने देखील साथ दिल्यामुळे आपल्याकडे त्याचा परिणाम काय झाला ते आपण पाहत असल्याचे ते म्हणाले. पण अद्याप कोरोनाचे भारतावरील संकट टळलेले नाही. पहिला 21 दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशात अनेक ठिकाणी लोक, विद्यार्थी, यात्रेकरू अडकले आहेत, त्यांना आणायचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे, त्यांना लगेच चाचण्या करून क्वॉरंटाईन करायचे आहे. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते प्रत्येक राज्यांने विचार करून ठरवायचे असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment