पुण्यात सुरु होऊ शकते कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन


नवी दिल्ली : रविवारी देशातील जनतेला दिलासा देणारी बातमी लस बनवणारी कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिली असून येत्या दोन ते तीन आठवड्यात कोरोनाशी लढण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या कोविड-१९ लसीचे उत्पादन सुरू करायची योजना असल्याचे सिरम इन्स्टिट्यूटने सांगितले आहे. या लसीचे मानवी परीक्षण यशस्वी झाले, तर ही लस ऑक्टोबर महिन्यात बाजारात येऊ शकते, असा दावाही कंपनीने केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत कोरोनाची लस तयार करण्यासाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि जगातल्या इतर ७ कंपन्यांनी भागीदारी केली आहे.

याबाबत माहिती देताना सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला म्हणाले, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर हिल यांच्यासोबत आमची टीम काम करत आहे. लसीचे उत्पादन पुढच्या दोन ते तीन आठवड्यामध्ये सुरु करण्याची अपेक्षा आहे. पहिले ६ महिने उत्पादनाची क्षमता प्रती महिना ५० लाख लसींची असेल. यानंतर उत्पादन प्रती महिना १ कोटी असण्याची अपेक्षा आहे.

याआधीही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने मलेरिया व्हॅक्सिन प्रोजेक्टमध्ये काम केले होते. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ‘कोविड-१९ची लस बाजारात यावी अशी आमची अपेक्षा आहे, फक्त लसीचे परीक्षण यशस्वी आणि सुरक्षित झाले पाहिजे. पुढच्या २ ते ३ आठवड्यात आम्ही या लसीचे भारतात टेस्टिंग सुरू करणार आहोत. भारतात ही टेस्टिंग सुरू करण्यासाठी आवश्यक मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पुनावाला यांनी सांगितले.

सध्याची परिस्थिती बघता या प्रयत्नासाठी आम्ही स्वत: अर्थसहाय्य केले आहे. उत्पादन वाढल्यानंतर आमचे अन्य भागीदारही मदत करतील, अशी आशा पुनावाला यांनी व्यक्त केली. पुण्याच्या प्लांटमध्ये ‘कोविड-१९च्या लसीचे उत्पादन केले जाईल, कारण यासाठी वेगळा प्लांट बनवायचे ठरवले, तर त्यासाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लागेल. कंपनी या लसीचे पेटंट करणार नाही, तसेच फक्त भारतासाठीच नाही तर जगातील इतर कंपन्यासाठीही उत्पादन आणि विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. जो कोरोनाची लस विकसित करेल, त्याला उत्पादनासाठी अनेक पार्टनरची गरज पडेल, असे वक्तव्य पुनावाला यांनी केले.

Leave a Comment