कोरोनाः कोणताही देश किंवा जागतिक संघटनेने पाकला दिली नाही फुटकी कवडी


इस्लामाबाद : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने तांडव माजवल्यानंतर अनेक देशांनी एकमेकांना मदत करत आपल्या उदार अंतकरणाचे दर्शन घडवले. पण याला एक देश अपवाद ठरला आहे. भारताच्या शेजारील राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला कोरोना व्हायरसच्या संकटात अद्याप पर्यंत कोणत्याच देशाने आर्थिक मदत केलेली नाही. या वृत्ताला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीच दुजोरा दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून इम्रान खान यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. कोणत्याच देशाकडून पाकिस्तानला एक डॉलरची देखील मदत झाली नसल्याचे इम्रान खान म्हणाले.

यासंदर्भात न्यूज एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान म्हणाले, संपूर्ण जग आणि पाकिस्तानसाठी कोरोनानंतरची स्थिती परीक्षा असेल. पाकिस्तानची स्थिती युरोप आणि अमेरिकेपेक्षा वेगळी आहे. पाकिस्तानवर लॉकडाऊनचा दुष्परिणाम झाला आहे. लॉकडाऊन मला लागू करायचा नव्हता, कारण मजूर आणि रोजंदारीवर कमावणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. पाकिस्तानमध्ये ७५ टक्के नोंदणीकृत मजूर नाहीत.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेविषयीही यावेळी इम्रान खान यांनी चिंता व्यक्त केली. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे मोठा धक्का लागला आहे. पाकिस्तानला कोणताही देश किंवा जागतिक संघटनेने फुटकी कवडीही दिली नाही, पण आयएमएफने कर्ज फेडण्यासाठी दिलासा दिल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.

इम्रान खान यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांवरही निशाणा साधला. सोशल मीडियावर अनेक लोक खोटा प्रचार करत आहेत. भ्रष्टाचाराने ज्यांनी पैसे कमावले आहेत, त्यांना मीडियाची भीती वाटत आहे, कारण आपला बिंग फुटेल. आयएसआयने ट्रॅक ऍण्ड ट्रेस सिस्टिम सुरू केल्यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट शोधायला मदत होईल, अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाग्रस्तांची संख्या १३ हजारांच्या पुढे गेली आहे. तर मृतांचा आकडा २८१ एवढा झाला आहे.

Leave a Comment