अक्षय कुमारची मुंबई पोलीस फाऊंडेशनला 2 कोटींची मदत


देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाला हरवण्यासाठी देशभरातील डॉक्टर, पोलीस, नर्सेस, सफाई कर्मचारी सर्वचजण एकवटले आहेत. पण त्यातही विशेष कौतुक करायचे झाले तर ते पोलीस बांधवांचे! पण जर कोरोनाशी या सर्वांना लढायचे असेल तर त्यांना मिळणारी सामग्री देखील अद्यावत असणे आवश्यक आहे. त्यासाठीच अभिनेता अक्षय कुमार मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी धावून आला आहे. मुंबई पोलीस फाऊंडेशनला त्याकरता अभिनेता अक्षय कुमारने 2 कोटींची मदत केली आहे.


अक्षय कुमारचे आभार मानणारे ट्विट कमिशनर ऑफ मुंबई पोलीस यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले आहे. जे पोलीस कर्मचारी शहराचे संरक्षण करण्यासाठी बांधिल आहेत त्यांच्या संरक्षणासाठी या निधीचा वापर करण्यात येईल, असे ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.

दरम्यान अक्षय कुमारने याआधी पंतप्रधान मदत निधीमध्ये 25 कोटींची तर मुंबई महापालिकेसाठी 3 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. त्याने आतापर्यत 28 कोटी दान केल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आतापर्यंत जेव्हाही देशावर काही ना काही संकट आले आहे. अक्षयने प्रत्येक वेळी लोकांची मदत केली आहे. त्याने सोशल मीडियावर या काळात केवळ लोकांचे आयुष्य महत्त्वाचे असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पोस्ट करून त्याने जनजागृती देखील केली आहे. कोरोनाबाबत लढा देणाऱ्या कोरोना कमांडोंसाठी त्याची ही मदत नक्कीच प्रेरणादायी आहे.

Leave a Comment