पाकिस्तानी मौलानाचा जावई शोध; वाढत्या अश्लीलतेमुळे अल्लाहनेच धाडला कोरोना


इस्लामाबाद – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचे मृत्यु तांडव सुरु आहे. या जीवघेण्या आजारासमोर जगातील अनेक देश हतबल झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. पण याच दरम्यान पाकिस्तानातील एका मौलानाने कोरोनाबाबत एक अजबच जावईशोध लावला आहे. या मौलानाच्या म्हणण्यानुसार कोरोना हा अल्लाहने दिलेला शाप असून जगभरात वाढती अश्लीलता पाहून अल्लाहनेच हे संकट जगावर पाठवले आहे. मौलानाच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर भरभरुन टीका होत आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय टेलिव्हिजनवर पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोना पीडितांसाठी मदतनिधी गोळा करण्यासाठी आयोजित केलेल्या टेलिथॉनदरम्यान मौलाना तारिक जमील या मौलानाने हे विधान केले होते. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार मौलाना जमील यांनी सांगितले की, कोरोनाच्या रुपात अल्लाहच्या कोपाचा सामना अवघे जग करत आहे. वाढती अश्लीलता आणि नग्नता हे अल्लाहच्या या कोपाचे कारण आहे. मुलींकडून नृत्य करवून घेतले जात आहे. त्यांचे कपडे कमी होत आहेत. समाजात अश्लीलता सर्वसामान्य बाब झाल्यामुळे अल्लाह नाराज झाले आहेत.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी मौलानांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. महिलांचा अपमान करणारे हे वक्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मौलानांचे हे वक्तव्य कोरोनाविषयीचे अज्ञान आणि महिलविरोधी मानसिकता दाखवत असल्याचे शिरीन माजरी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment