कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा लागण होण्याची शक्यता किती ?

सध्या देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. मात्र या आजारातून अनेक रुग्ण बरे देखील होत आहेत. मात्र या आजारातून बरे झाल्यानंतर रुग्णांना पुन्हा कोरोना होऊ शकतो का ? या प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर दिले जात आहे. याचे सत्य जाणून घेऊया.

सर्वसाधारणपणे असे समजले जाते की रुग्ण एका व्हायरसमधून बरा झाल्यानंतर त्याचे शरीर त्या व्हायरशी लढा देते. रुग्ण बरा होताना शरीरात रोगप्रतिकारक प्रणाली अँटीबॉडी तयार करते. अँटीबॉडीमुळे रुग्णाला व्हायरसची पुन्हा लागण होत नाही. मात्र कोरोनाच्या बाबतीत हे शक्य आहे का ?

आतापर्यंतच्या माहितीनुसार, असा दावा करणे शक्य नाही. अमेरिकेची आरोग्य संस्था सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) याबाबतचे उत्तर दिले आहे.

सीडीसीनुसार, कोरोनाच्या बाबतीत शरीराची इम्युन प्रतिक्रिया आणि इम्युनिटीचा कालावधी अद्याप समजलेला नाही. MERS-CoV व्हायरसच्या बाबतीत पुन्हा लागण होण्याची शक्यता कमी असते. मात्र कोव्हिड-19 च्या बाबतीत शरीरात तसेच इम्युन प्रोटेक्शन होईल का, हे अद्याप समजलेले नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी म्हटले की, आतापर्यंत अनेकजण समजत होते की कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. मात्र याबाबतचा ठोस पुरावा नाही.

डब्ल्यूएचओचे इमर्जेंसी प्रोग्रामचे एग्झिक्यूटिव्ह डायरेक्टर मायक रयान म्हणाले की, बरे झालेले लोकांना पुन्हा लागण होणार नाही याबाबतचे ठोस पुरावे नाहीत. कोणालाही माहिती नाही की ज्या लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत, ते पुर्णपणे आजारापासून सुरक्षित आहेत.

दक्षिण कोरियामध्ये 100 पेक्षा अधिक जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र हे रुग्ण पुन्हा संक्रमित झाले आहेत की आधीच्या चुकीच्या चाचणीमुळे ते नेगेटिव्ह असल्याचे सांगितले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment