लॉकडाऊनमुळे भेंडवळच्या घटमांडणीची 300 वर्षांची परंपरा खंडित


बुलढाणा : देशासह राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे यावर्षी अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर होणारी भेंडवळची भविष्यवाणी स्थगित करण्यात आली आहे. यंदा बुलढाण्याची 300 वर्षांपासूनची परंपरा असलेली भेंडवळची घटमांडणी खंडित होणार आहे.

उद्या साडेतीन मुहूर्तापैकी असलेला अक्षयतृतीया हा मुहुर्त आहे. दरवर्षी अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भेंडवळ येथे घटमांडणी करण्यात येते. पण ही घटमांडणी यंदा लॉकडाऊनमुळे पुढे ढकलून लॉकडाऊन संपल्यावर म्हणजेच 3 मेनंतर वैशाख महिन्यातील कुठल्याही शुभ तिथीला घटमांडणी साकारण्याचे संकेत वाघ महाराजांनी दिले आहेत. त्यामुळे घटमांडणी रद्द नव्हे तर स्थगित झाली आहे.

गेल्या 300 वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावात घटमांडणीची परंपरा आहे. ही परंपरा येथील वाघ घराण्यात असून, गेल्या 300 वर्षांपूर्वी निलावती विद्येचे ज्ञान असलेले चंद्रभान महाराज वाघ यांनी ती सुरु केली होती. आजही त्याच परिवारात ही परंपरा सुरु आहे. जिल्ह्यातील नव्हे, तर या मांडणीच्या भाकितावर राज्यातील शेतकर्‍यांचा प्रचंड विश्वास आहे. या मांडणीवर शेतकरी दरवर्षी पीक-पाण्याचे नियोजन करतात.

Leave a Comment