जाणून घ्या काय आहे अमोल कोल्हेंनी सुचवलेला ‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ प्लान


मुंबई : केंद्र तसेच राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पण अद्यापही कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात फरक पडत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला एक महत्वूपर्ण सल्ला दिला. त्यांनी यामध्ये केंद्राने ‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लान तयार करावा अशी सूचना केलेली आहे.

दीर्घकाळपर्यंत लॉकडाऊन थांबवणे आपल्या अर्थव्यवस्थेला, उद्योगांना, कामगार, नोकरदार आणि सर्वसामान्य जनता यापैकी कुणालाच परवडणारे नसल्यामुळे आपण ज्याप्रमाणे टीबी, मलेरिया, H 1 N 1 अशा आजारांसह दैनंदिन आयुष्य जगतो, त्याच धर्तीवर केंद्र सरकारने ‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ असा प्लान तयार करावा अशी सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पथकासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत केली.

राज्य सरकार कोरोना रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पथक निर्माण करण्यात आले. पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात या पथकाने जिल्ह्यातील खासदार, आमदार आदींसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक घेतली. डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत अतिशय अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून अनेक महत्त्वाच्या बाबींकडे या पथकाचे लक्ष वेधले.

त्यांनी या चर्चेत आपण लॉकडाऊन केले आहे. पण मास टेस्टिंग करत नसल्याची विसंगती लक्षात आणून दिली आणि मास टेस्टिंगची मागणी केली आहे. तसेच ‘को एक्झिस्टींग विथ कोरोना’ प्लान तयार करून प्रथम ग्रीन झोनमध्ये त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ऑरेंज आणि रेड झोनमध्ये हा प्लान राबवावा असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे वैद्यकीय उपचार करणाऱ्या स्टाफची इंटरव्हलला नियमित तपासणी करण्यात यावी. उपचार करणारी रुग्णालये कोरोना संसर्गाची केंद्रीय बनणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून डॉ. कोल्हे यांनी “टायफाईड मेरी” या बहुचर्चित घटनेप्रमाणे घडू नये अशी अपेक्षा व्यक्त करताना इटली सारख्या देशात एकाच वेळी अनेक रुग्णांलयात कोरोना रुग्णावर उपचार केले गेल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊन परिस्थिती अधिक गंभीर बनली, याकडे केंद्रीय पथकाचे लक्ष वेधून कोविड रुग्णालयात एकाच वेळी रुग्ण दाखल करून उपचार करण्याऐवजी एका रुग्णालयाची खाटांची क्षमता संपेपर्यंत दुसऱ्या रुग्यालयात दाखल कोरोनाचा रुग्ण दाखल करू नये, अशी सूचनाही डॉ. कोल्हे यांनी केली.

Leave a Comment