बॉलीवूड फिल्म्स ओटीटी वर रिलीज होण्याची शक्यता


फोटो साभार एक्सपी
देशात पसरलेल्या कोविड १९ साथीचा विपरीत परिणाम अन्य उद्योगक्षेत्रांप्रमाणे बॉलीवूड उद्योगावरही झाला असून अनेक बॉलीवूड निर्माते यातून मार्ग काढण्यासाठी आता वेगळा विचार करू लागले असल्याचे समजते. लॉकडाऊन मुळे थियेटर्स बंद आहेत, शुटींग बंद आहे आणि नवीन फिल्म्स रिलीज होत नाहीत. इतकेच नाही तर लॉक डाऊन संपल्यावर सुद्धा थियेटर्समध्ये येऊन फिल्म पाहण्यास किती प्रेक्षक रस दाखवतील याची शंका आहेच. अश्या परिस्थितीत जे चित्रपट रिलीज साठी तयार आहेत त्यांचे भवितव्य काय असा मोठा प्रश्न आहे.

यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न निर्माते करत असून ओटीटीवर फिल्म रिलीज करता येण्याची शक्यता चाचपून पाहत आहेत. फिल्म विश्लेषक कोमल नहाटा यांच्या माहितीनुसार नेटफ्लिक्स, झी ५, प्राईम व्हिडीओ, अमेझॉन अश्या अनेक ओटीटी वर चित्रपटाचे प्रीमियम करण्यासाठी बोलणी केली जात आहेत. सहा बड्या फिल्मबाबत अशी बोलणी सुरु असून या चित्रपटात काम केलेले सर्व अभिनेते लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या चित्रपटाची प्रेक्षक नेहमीच प्रतीक्षा करत असतात. हे घडले तर रसिकांना थियेटर ऐवजी थेट मोबाईलवरच नवे चित्रपट पाहता येणार आहेत.

अर्थात छोट्या बजेटचे चित्रपट या माध्यमातून रिलीज करण्यास फार अडचण नाही मात्र १०० कोटीच्या पुढचे बजेट असलेले चित्रपट या माध्यमातून रिलीज करणे थोडे अवघड आहे. नहाटा यांच्या मते ओटीटी साठी चित्रपट करार करताना बॉक्स ऑफिसवर तो चित्रपट किती व्यवसाय करेल याचा अंदाज घेऊन त्याची किमत निश्चित केली जाते. मोठ्या बजेटच्या चित्रपटाचा बराचसा खर्च वितरकांना राईट्स विकून वसूल केला जातो. त्यात सॅटेलाईट राईट मुख्य कमाईचे साधन असते आणि हे चित्रपट थियेटरमध्ये रिलीज होणारे असतात.

आता मुख्य प्रश्न असा आहे की ओटीटी वर रिलीज झालेल्या चित्रपटांचे सॅटेलाइट राईट्स कुणी घेईल का? त्यामुळे या चित्रपटाची किंमत ठरविणे हेच मोठे आव्हान सध्या निर्मात्यांसमोर आहे.

Leave a Comment