पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील सत्तावीस तर औरंगाबादमधील 200 कंपन्या पुन्हा सुरु


पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील सत्तावीस मोठे उद्योग पुन्हा सुरु करण्यात आले असून या उद्योगांना लॉकडाऊनच्या काळातील सर्व नियम आणि अटी पाळून काम सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी दिली आहे.

औषधे आणि अन्न प्रक्रिया करणारे एक हजार चारशे पन्नास उद्योग लॉकडाऊनच्या कालावधीतच या पाच जिल्ह्यांमधील टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 53 हजार कामगार कार्यरत आहेत. त्यामध्ये आता सत्तावीस मोठ्या उद्योगांची भर पडली आहे. दरम्यान पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील उद्योग मात्र अद्यापही बंदच आहेत.

एक हजार 900 कामगारांना या 27 उद्योगांमुळे पुन्हा रोजगार उपलब्ध झाला असून कामाच्या ठिकाणीच या कामगारांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याच्या अटीवर हे उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Comment