पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारतीय खेळाडूंची टरकायची; इम्रान खानचा बालिश दावा


भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध संपूर्ण जगाला माहित आहेत. त्यातच क्रिकेटच्या मैदानावरही दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या राजकीय परिस्थितीचे पडसाद उमटताना अनेकदा दिसले आहेत. भारतीय संघ सध्याच्या घडीला जगातील अव्वल संघ आहे आणि भारतीय संघाला सध्याच्या घडीला हरवणे वाटते तेवढे सोपे मुळीच नाही. पण पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्या काळाच्या आठवणींना उजाळा देताना भावनेच्या भरात एक बालिश वक्तव्य केले आहे. भारतीय संघाला सहजपणे हरवणे नक्कीच सोपे नाही. पण एकेकाळी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला बरेच परिश्रम घ्यावे लागत होते, असे म्हटले आहे.


आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 59 कसोटी सामने झाले आहेत आणि त्यापैकी पाकिस्तानने 12 सामने जिंकले आहेत. केवळ 9 सामने भारताला जिंकता आले आहेत, तर 38 सामने बरोबरीत सुटले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये उभय संघ 132 वेळा एकमेकांना भिडले आहेत आणि त्यातही सर्वाधिक 73 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. भारताने केवळ 55 एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला आहे. पण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघावर पाकिस्तानला एकदाही विजय मिळवता आलेला नाही.

सध्या सोशल मीडियात इम्रान खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांनी त्यात भारतीय कर्णधार आणि खेळाडू पाकिस्तानचा सामना करताना टरकायचे असा उल्लेख केला आहे. भारतीय संघाचे मला वाईट वाटते, कारण त्यांना आम्ही सहज हरवायचो. भारतीय संघ आमच्याविरुद्ध खेळताना प्रचंड दबावाखाली असायचा. भारतीय संघाचा कर्णधार नाणेफेकीला यायचा तेव्हा त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावरील भीती जाणवायची. अर्थात त्यावेळी आमचा कट्टर प्रतिस्पर्धी भारत नव्हता तर वेस्ट इंडिजचा संघ होता.

Leave a Comment