सिगरेटमधील निकोटिन कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतो का? फ्रान्समध्ये संशोधन सुरु


नवी दिल्ली – जगभरातील बऱ्याच देशांमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीचे काम वेगवेगळया देशांमध्ये वेगात सुरु आहे. त्यातच आता सिगरेटमध्ये असणारे निकोटिन कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकते का? या दृष्टीने संशोधन सुरु आहे. कोरोनाच्या संक्रमणापासून निकोटिनमुळे बचाव होऊ शकतो, ही बाब फ्रान्समधील संशोधनातून समोर आली आहे.

निकोटिन या पदार्थाचा उपयोग कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी, उपचारांमध्ये करता शकतो का? यासाठी आणखी काही चाचण्या फ्रान्समध्ये करण्यात येणार आहेत. संशोधक या निष्कर्षाप्रत पॅरिसमधील एका मोठया रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह ३४३ रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर आले आहेत. या ३४३ रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले १३९ रुग्ण होते.

फ्रान्समधील जवळपास ३५ टक्के नागरिक धूम्रपान करतात. पॅरिसच्या रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाग्रस्तांपैकी फक्त पाच टक्के रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन आहे. मागच्या महिन्यात न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीशी मिळता-जुळता फ्रान्समधील संशोधकांचा अभ्यास आहे.

चीनमधील १ हजार कोरोनाग्रस्तांमागे १२.६ टक्के लोकांना ध्रूमपानाची सवय आहे. चीनमध्ये नियमित धूम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार चीनमध्ये २६ टक्के लोक धूम्रपान करतात. निकोटिन पेशींना चिकटून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे पेशींमध्ये व्हायरसच्या प्रवेशाचा मार्ग बंद होतो आणि कोरोना शरीरात फैलावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही थिअरी निकोटिनचा वापर करण्यामागे आहे. संशोधक आणखी क्लिनिकल ट्रायल घेण्यासाठी फ्रान्समधील आरोग्य यंत्रणेच्या परवानगीची वाट पाहत आहेत. कोरोनाचे संक्रमण निकोटिनद्वारे रोखता येऊ शकते का? हे तपासण्यासाठी पॅरिस येथील हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवकांवर निकोटिन पॅचेसचा वापरण्याची योजना आहे.

Leave a Comment