कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा


नवी दिल्ली : संपूर्ण जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसने अशरक्षः थैमान घातल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशातच संपूर्ण जगाला कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर एक गंभीर इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, कोणतीही चूक करू नका, आपल्यासोबत बराच काळ हा व्हायरस राहणार आहे. डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस यासंदर्भात बोलताना म्हणाले की, कोरोना व्हायरसच्या महामारीची अनेक देशांमध्ये आताच सुरुवात झाली आहे. या व्हायरसने ज्या चीनमध्ये जन्म घेतला तिथे पुन्हा या व्हायरसचा संसर्ग झालेले रूग्ण आढळून आले असल्यामुळे कोणतीही चूक करू नका, हा व्हायरस आपल्यासोबत बराच काळ राहणार आहे.

आंतराष्ट्रीय वाहतूक त्वरित सुरू करण्याबाबत डब्ल्यूएचओचे टॉप इमरजन्सी एक्सपर्ट डॉ माइक रयान यांनी इशारा दिला आहे. ते यासंदर्भात बोलताना म्हणाले की, असे करणे खूप धोकादायक ठरू शकते. तसेच जगभरातील लॉकडाऊन हटवण्याचा विचार करतानाही सावध राहून विचार करण्यास डब्ल्यूएचओने सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉकडाऊनमध्ये जगभरातील अनेक देश सूट देत आहेत. तर काही देशांनी लॉकडाऊन हटवला देखील आहे. या देशांना डब्ल्यूएचओने सावधानतेचा इशारा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दोन दिवसआधी देखील इशारा देताना सांगितले होते की, यापेक्षाही वाईट परिस्थिती आगामी काळात येणार आहे. परंतु डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी त्यांना असे का वाटते, यासंदर्भात कोणतेही भाष्य केले नव्हते. ते असेही म्हणाले होते की, जागतिक आरोग्य संघटना आधीपासूनच कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावाबाबत जागरूक करत आहे.

दरम्यान, जगभरात कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसमुळे आतापर्यंत 1.84 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे. 26 लाखांहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत. या आजाराने अमेरिकेमध्ये सर्वाधिक बळी घेतले आहेत. अमेरिकेत 8.5 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 47000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.

जागतिक आरोग्य संघटना, डब्ल्यूएचओचे प्रमुख म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखणाचा जो निर्णय अमेरिकेने घेतला आहे. त्यावर ते पुन्हा विचार करतील. पुढे बोलताना ते म्हणाले की, अमेरिकेकडून राजीनामा मागितल्यानंतरही आम्ही जग वाचवण्यासाठी काम करत राहू. दरम्यान, मागील आठवड्यात डब्ल्यूएचओचा निधी रोखणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती.

जागतिक आरोग्य संघटनेविरोधात अमेरिकेते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेती आहे. अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारा निधी रोखण्याचा आदेश दिल्याचे ट्रम्प यांनी 14 एप्रिलच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या सुरुवातीपासूनच जागतिक आरोग्य संघटनेबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. चीन केंद्रित जागतिक आरोग्य संघटना काम करत असल्याचे ट्रम्प म्हणाले होते. यानंतर त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा इशाराही दिला होता. अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला दरवर्षी 400 ते 500 मिलियन डॉलरची मदत केली जाते. हीच मदत रोखण्यात येत असल्याचे ट्रम्प म्हणाले होते.

जगभरात आरोग्य क्षेत्रात जागतिक आरोग्य संघटना ही काम करते. यादरम्यान काही ना काही उपक्रम वर्षभर सुरुच असतात. प्रत्येक देश यासाठी जागतिक आरोग्य संघटनेत गुंतवणूक करतो. ज्यात अमेरिका हा अनेक वर्षांपासून सर्वाधित निधी देणार देश आहे. अमेरिकेने मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेला 400 मिलियन डॉलर निधी दिला होता, जो जागतिक आरोग्य संघटनेच्या एकूण बजेटच्या 15 टक्के आहे. या तुलनेत चीनबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा निधी अमेरिकेच्या निधीसमोर तूटपुंजा आहे. चीनने 76 मिलियन डॉलर एवढा निधी दिला होता. याशिवाय 10 मिलियन डॉलरची अतिरिक्त मदत केली होती.

Leave a Comment