‘नेटफ्लिक्स’ची चंगी, लॉकडाउनमुळे मिळाले १.५ कोटींपेक्षा जास्त नवे युजर्स


अॅप्स आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग वेबसाइट्सची सध्या मनोरंजन क्षेत्रात चर्चा आहे. सध्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक नवनवीन अॅप्स उपलब्ध असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती नेटफ्लिक्सला असल्याचे पाहायला मिळते. नेटफ्लिक्स या लॉकडाउनच्या काळात मालामाल झाले असून त्यांच्या नव्या युजर्सची संख्या केवळ तीन महिन्यांमध्ये झपाट्याने वाढली आहे.

अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन जाहिर करण्यात आला आहे. सर्व काही या काळात बंद असल्यामुळे देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. आर्थिक संकटाचा अनेकांना सामना करावा लागत आहे. पण नेटफ्लिक्सची या काळात चांगलीच चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. या लॉकडाऊनच्या काळात नेटफ्लिक्सला कोटींच्या घरात नवे युजर्स मिळाल्याचे वृत्त आहे.

यासंदर्भात ‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार लॉकडाउनच्या काळात घरात बसून कंटाळलेल्या अनेकांनी मनोरंजनासाठी विविध अॅप्स आणि ऑनलाइन स्ट्रिमिंग वेबसाइटचा आधार घेतला आहे. यात नेटफ्लिक्सला जगभरातील अनेकांनी सबस्क्राइब केल्यामुळे नेटफ्लिक्सला जगभरातून तब्बल १.५ कोटींपेक्षा जास्त नवे सब्सक्राइबर्स मिळाले आहेत.

लॉकडाउनच्या काळात कंपनीला ७ मिलियन नवे सबस्क्राइबर मिळतील असे वाटत होते. पण त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त युजर्स मिळाले आहेत. जवळपास ६४ मिलियन लोकांनी या लॉकडाउनच्या काळात ‘टायगर किंग’ डॉक्युमेंट्री पाहिली आहे. तर नेटफ्लिक्सचा ओरिजन चित्रपट ‘सस्पेंसर कॉन्फेंडेशिअल’ला ८५ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.

Leave a Comment