आयटी कंपन्यांना कामगार विभागाची तंबी : कर्मचारी आणि वेतन कपात कराल तर खबरदार


पुणे : अनेक कंपन्या लॉकडाऊनदरम्यान कर्मचारी कपात किंवा वेतन कपात करत आहेत. कर्मचारी कपात करु नका, शिवाय वेतन कपातीचाही निर्णय घेऊ नका असे वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावूनही, आता लॉकडाऊनचे कारण देत, अनेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. कर्मचारी कपातीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयटी कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

कामगार विभागाने अशा कंपन्यांना कर्मचाऱ्यांना रजेवर पाठविल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही कामावरुन कर्मचाऱ्यांना काढू नये असे आवाहन केले होते. पण यातून पळवाटा काढत आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणे, पगारात कपात करणे, असे निर्णय घेत आहेत. आता कामगार विभागाकडून अशा कंपन्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत.

देशातील लॉकडाऊन कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. देशाला संबोधित करताना 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमध्ये 19 दिवसांची वाढ केली. मोदींनी यावेळी देशातील सर्व संस्थांना आवाहन केले की, आपल्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची काळजी घ्या. कुणालाही नोकरीवरुन काढू नका.

मुंबई उच्च न्यायालयात लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी कपात किंवा पगार कपात करु नये अशी मागणी करणारी याचिका अॅड. युसूफ इकबाल यांनी दाखल केली आहे. कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात कामावरुन काढणे किंवा कमी करण्याचे प्रकार सुरु आहेत. याशिवाय अनेकांच्या पगारात कपात किंवा पूर्णत: पगार न देण्याचा निर्णय अनेक कंपन्या, व्यावसायिकांनी घेतला आहे. पण त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

Leave a Comment