महाराष्ट्रातील हॉटस्पॉट १४ वरुन पाचवर, आरोग्यमंत्र्यांची माहिती


मुंबई – फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील डबलिंग रेट हा सध्या सात दिवसांवर आला असून आपण सध्या जे कमी करतो आहे. डबलिंग रेटसाठी आता लागणारा कालावधी आपल्याला आणखी वाढवायचा आहे. राज्याला आयसीएमआरने ज्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचे असल्याचे राजेश टोपेंनी म्हटले आहे. आपल्या राज्यात १४ हॉटस्पॉट होते ते आता पाचवर आल्याचे चित्र दिलासादायक असून औरंगाबाद, सांगली, अहमदनगर हे हॉटस्पॉट होते. पण ते आता हॉटस्पॉट नाहीत. जास्त फोकस मालेगाववर केला असता तर हॉटस्पॉट चारच असते असेही त्यांनी म्हटले आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या ही व्यवस्थित असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

मी केंद्रीय समितीसोबत धारावी आणि अन्य ठिकाणी होतो. कोरोनामुळे जनतेत काहीसे भीतीचे वातावरण आहे. जो अंदाज वर्तवण्यात आला आहे तो मॅथेमॅटिकल आहे. काही शास्त्र यासाठी असते पण त्यामध्ये असेही आहे काही गृहितके धरली गेली आहेत. उदा. आपला डबलिंग रेट ३.८ असेल. आपण काहीही केले नाही तर काय होईल? असे अंदाज आहेत. ७ हजारांपेक्षा जास्ट टीम हे सर्वे करत असल्यामुळे कुणीही घाबरुन जाऊ नये असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ९० हजाराच्या आसपास टेस्ट झाल्या असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आत्तापर्यंत राज्यातील ७८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत ३ हजार ६८३ एवढे रुग्ण असल्चाही माहिती त्यांनी दिली. आपल्या ३८ लॅब मध्ये ७ हजारांपेक्षा जास्त टेस्ट होत असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. आधी तीन दिवसात रुग्ण संख्या दोन अंकी व्हायची ती आता सात दिवसांवर गेली आहे. मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. महाराष्ट्रासाठी विशेष टास्क फोर्स नेमण्यात आली आहे. एकही मृत्यू होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. जे मृत्यू झाले त्यापैकी बहुतांश रुग्णांना इतर आजारांचा इतिहास असल्याचेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

आपण संस्थात्मक क्वारंटाइन वाढवतो आहोत. समजा रुग्णांची संख्या वाढली तर आपली तयारी असावी तरीही आपण सगळी तयारी करतो आहोत. होम क्वारंटाइन धारावीत शक्य नसल्यामुळे ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर समोर या असे आवाहन राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा केले. अगदी शेवटच्या स्टेजला बरेच रुग्ण येतात, दुर्लक्ष करतात त्यावेळी उपाय करणे कठीण होऊन बसते. हे घडू नये म्हणून थोडीही लक्षणे दिसली तरीही फिव्हर क्लिनिकमध्ये जा असेही आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. ८३ टक्के लोक हे सृदृढ आहेत त्यांच्यात लक्षणे नाहीत हे सगळे चित्र आशादायी आहे. कुणीही घाबरुन जाऊ नये असे मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगेन असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment