कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांकडून प्रेरणादायी, वर्कआउट व्हिडीओ शेअर

कोरोना व्हायरस महामारीशी लढण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलीस दल सर्वात पुढे येऊन काम करत आहे. मात्र आपली सेवा बजावताना या कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. असे असताना देखील ते हार न मानता आपले कर्तव्य बजावत आहेत व दुसऱ्यांसमोर एक उदाहरण सादर करत आहेत.

अशाच प्रकारे सेवा बजावताना पंजाब पोलिसात कॉन्स्टेबल असणारे प्रभजोत सिंह यांना देखील कोरोनाची लागण झाली. मात्र प्रभजोत यांच्यासाठी ही मोठी गोष्ट नाही. आपल्या सहकार्यांचा या काळात उत्साह कायम ठेवण्यासाठी प्रभजोत हॉस्पिटलमध्ये चक्क पुशअप्स मारत आहेत.

प्रभजोत म्हणाले की, मला माझ्या सहकार्यांना सांगायचे आहे की कोरोना होणे ही काही मोठी गोष्ट नाही. मला तंदुरुस्त राहायचे आहे त्यामुळे पुशअप्स मारत आहे.

(व्हिडीओ सौजन्य – द ट्रिब्यून)

आणखी एक पोलीस सब-इंस्पेक्टर अर्शप्रीत कौर ग्रेवाल यांना देखील सेवा बजावताना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपले सहकारी, मित्र, नातेवाईक लोकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करत व्हिडीओ शेअर केला आहे.

अर्शप्रीत आपल्या फेसबुक व्हिडीओमध्ये म्हणाल्या की, खंबीर रहा आणि आपण नक्कीच कोव्हिड-19 वर विजय मिळवू. कामावर असताना योग्य ती खबरदारी घ्या. वारंवार हात धुवा, मास्क लावा आणि सॅनिटायझरचा वापर करा. चांगला आहार घ्या. जेवण टाळू नका आणि योग्य ती तपासणी करा. हे तुम्हाला योग्यप्रकारे काम करण्यास मदत करेल.

कौर या बस्ती जोधेवाल पोलीस स्टेशनमध्ये स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणून नियुक्त आहेत. त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे देखील आवाहन केले.

प्रभजोत आणि अर्शप्रीत या दोघांनाही असिस्टेंट पोलीस कमिश्नर अनिल कोहली यांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली. अनिल कोहली यांचा काही दिवसांपुर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

डीजीपी पंजाब पोलिसने देखील ट्विटरवर अर्शप्रीत यांचा व्हिडीओ शेअर करत त्यांचे कौतूक केले.

Leave a Comment