सरकारचा नवीन अध्यादेश, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना होणार 7 वर्षांपर्यंतची जेल

केंद्र सरकारने कोरोना व्हायरस महामारीपासून लोकांना वाचवण्यासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने अध्यादेश जारी करत सांगितले की आरोग्य कर्मचार्‍यांशी अनैतिक वागणूक, हिंसाचार किंवा शोषण करणाऱ्या गुन्हेगारास 7 वर्षांची शिक्षा आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, सरकारने साथीचा रोग प्रतिबंध अधिनियम १८९७ कायद्यात बदल करत अध्यादेश आणला आहे. यातील तरतूदीनुसार, आरोग्य कर्मचाऱ्यांशी कोणताही अनुचित व्यवहाराच्या प्रकरणाचा 30 दिवसात तपास केला जाईल. या प्रकरणात 3 महिने ते 5 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 50 हजार रुपये ते 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठवण्यात येईल. याशिवाय या गुन्ह्यात जामीन मिळणार नाही.

गुन्हा गंभीर स्वरूपाच असल्यास गुन्हेगारास 6 महिने 7 वर्षांपर्यंतची शिक्षा देखील होऊ शकते. अशा प्रकरणात दंडाची तरतूद 1 लाख ते 5 लाख रुपये असेल. या व्यतिरिक्त डॉक्टर अथवा आरोग्य कर्मचाऱ्याच्या गाडी अथवा क्लिनिकचे नुकसान झाल्यास बाजार मुल्याच्या दुप्पट नुकसान भरपाई घेतली जाईल.

या अध्यादेशावर राष्ट्रपतींची सही झाल्यावर कायद्याचे स्वरूप घेईल, असे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment