राजस्थान सरकारने थांबवला चीनच्या रॅपिड टेस्टिंग किट्सचा वापर ; कोरोनाग्रस्तांचे रिपोर्टही दाखवले निगेटिव्ह


जयपूर – चीनने निकषांची पूर्तता न करताच भारतामध्ये पीपीई किट्स पाठवल्याचा प्रकार चर्चेत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी चीनने पाठवलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स चुकीच्या असल्याचा खळबळजनक दावा केल्यामुळे चीनमधून आलेल्या या किट्सचा वापर करणे राजस्थान सरकारने तात्काळ थांबवले आहे.

चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स न वापरण्याचा राजस्थान सरकारने मंगळवारी निर्णय घेतल्यामुळे चीनमधून आयात करण्यात आलेल्या टेस्टिंग किट्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. चीनमधून आणण्यात आलेल्या या रॅपिड टेस्टिंग किट्सच्या माध्यमातून ९० टक्के अचूक निकाल देणे अपेक्षित आहे. पण, फक्त ५.४ टक्केच अचूक निकाल या किट्स देत असल्यामुळे या किट्सचा वापर करण्याचा काहीही उपयोग नाही. आयसीएमआरला (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) या किट्सबद्दलची माहिती देण्यात आली असल्याची माहिती राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी दिली.

आयसीएमआरचे राजस्थान सरकारने याकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्याशी यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून आम्ही आता काय करायचे? असा प्रश्नही आम्ही परिषदेकडे उपस्थित केला आहे. परिषदेच्या उत्तरांची प्रतिक्षा राजस्थान सरकार करत आहे. या रॅपिड टेस्टिंग किट्स प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे रिपोर्टही निगेटिव्ह दाखवत आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर सरकारने तात्काळ एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने किट्सच्या रिझल्टचा अभ्यास केल्यानंतर केवळ ५.४ टक्केच या किट्सचा परिणाम असल्याचे समोर आल्याची धक्कादायक माहिती रघू शर्मा यांनी दिली. हे किट्स चुकीचा रिझल्ट दाखवत असल्याने या किट्सचा वापर न करण्याचा सल्ला कमिटीने दिला होता. त्यानुसार राज्य सरकारने तातडीने या किट्सचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शर्मा यांनी दिली.

Leave a Comment