राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 466 नव्या रूग्णांची भर


मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून राज्यात 466 नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4666 वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक मुंबईत 3032 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर पुण्यात 594 लोक कोरोना बाधित आहेत. राज्यात दिवसभरात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील सात मुंबईतील तर दोनजण हे मालेगाव येथील आहेत. आजपर्यंत राज्यात 76,092 सँपल कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. पैकी 71,611 निगेटिव्ह आले तर 4666 जण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, राज्यातील दोन शहरे मुंबई आणि पुण्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.

राज्यात कालपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील काही उद्योग अंशत: सुरू करण्यात आले आहे. येथील उद्योगधंद्यांना अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. अशाच प्रकारे मुंबईतही काही कामांना परवानगी देण्यात येणार आहे. शहरातील कंटेनमेंट झोन वगळून बांधकाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग विषयक नियमांसह अन्य बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे. कामगारांची राहण्याची आणि दैनंदिन गरजांची सोय बांधकाम ठिकाणीच करणं बंधनकारक आहे. अटींचे पालन काटेकोरपणे होत नसल्याचे आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द होणार आहे.

Leave a Comment