तेलंगणा सरकारने ७ मे पर्यंत वाढवला लॉकडाउन


हैदराबाद – कोरोना व्हायरसचा देशातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊनमध्ये ३ मे पर्यंत वाढ केली. पण या निर्णयानंतर तेलंगणा सरकारने आता लॉकडाउनचा कालावधी वाढवत राज्यात ७ मे पर्यंत लॉकडाउन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी दिली आहे.

विदेशातून तेलंगणामध्ये आलेल्या ६४ जणांना कोरोनाची लागण झाली असून दिल्लीतील निजामुद्दीन स्थित मरकजमध्ये सामिल झालेल्या लोकांच्या प्रवासाचा इतिहासही आम्ही शोधत असल्याची माहिती तेलंगणा सरकारकडून देण्यात आली. दरम्यान, राज्यात ७ मे पर्यंत वाढवण्यात आलेल्या लॉकडाउनचे अतिशय कठोर आणि काटेकोरपणे पालन केले जाईल याची काळजी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सरकारने लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यासोबतच झोमॅटो, स्विगी आणि पिझ्झा घरपोच पोहोचवण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जर आपण पिझ्झा घेतला नाही तर आपल्याला काही होणार नाही, असे यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितल्यानंतर ५ मे रोजी परिस्थितीत पाहून मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सध्या विमानतळांवर उड्डाणे सुरू करणे शक्य नाही. रमझानच्या दरम्यान कोणतीही सुट दिली जाणार नाही आणि सर्वांना लॉकडाउनचे पालन करावेच लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment