पुण्यातील कोरोनाग्रस्त महिलेची यशस्वीरित्या प्रसुती


पुणे : पुण्याच्या ससून रुग्णालयात कोरोनाग्रस्त महिलेची यशस्वीरित्या प्रसुती करण्यात आली असून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. बाळाचे जन्म झाल्यानंतर त्याचे स्वॅबचे नमुने घेतले असून कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. महिलेने जन्म दिलेले बाळ हे कोरोनामुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे.


ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी या नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेची प्रसुती केली. डॉक्टरांपुढे कोरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसुती करण्याचे मोठे आव्हान होते. एकीकडे कोरोनाचे युद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनी या नव्या जीवाचाही मार्ग सुकर करुन दिला. कोरोनाच्या संकटातील जगातील ही सातवी प्रसूती ठरली. यापूर्वी चीन, लंडन, ऑस्ट्रोलिया, मुंबई, औरंगाबाद आणि धुळे अशी प्रसूती करण्यात आली होती. कोरोना झालेल्या महिलेचीही प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. बाळाचे वजन सुमारे साडे तीन किलो भरले असून, त्या नवजात बाळाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. परंतु बाळाची आई कोरोनाबाधित असल्यामुळे नवजात शिशुकक्षात बाळावर पुढचे काही दिवस उपचार होणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Leave a Comment