पालघर प्रकरण ; बबिता फोगाटची ठाकरे सरकारवर जहरी टीका


मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव वाढत असतानाच पालघरमध्ये डहाणू कॉलनी येथील कासा पोलिसांच्या हद्दीत चोर असल्याच्या संशयावरून तेथील ग्रामस्थांच्या जमावाने 3 जणांना मारहाण केली होती. या मारहाणीत तिघांचा मृत्यु झाला. या घटनेमुळे राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यातच भारतीय कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाट हिने देखील ठाकरे सरकारवर जहरी टीका केली आहे.


महाराष्ट्राच्या पालघरमध्ये संताची मारुन हत्या तेही पोलिसांसमोर, आता कुठे झोपले आहे उद्धव ठाकरे सरकार. लाज वाटली पाहिजे. सर्व दोषी कॅमेऱ्यासमोर आहेत. सर्व दोषींना कडक शिक्षा मिळाली पाहिजे, अशी टीका बबिता फोगाटने ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर केली आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारी मुंबईतील कांदिवली येथून सुरतकडे गाडीने जाणाऱ्या तिघांना गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गडचिंचले येथे चोर समजून 250 ते 300 च्या जमावाने रोखले. जमावाने त्यांच्यावर कोयता, कुऱ्हाड आणि दगडांच्या साहाय्याने त्यांना मारहाण केली. यामध्ये दोन साधू आणि एकाचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, पालघरमधील घडलेल्या घटनेचा सर्व स्तरातून आरोपींना कठोर शिक्षा होण्याची मागणी होत आहे. तर पालघरमधील घडलेला प्रकार लज्जास्पद असून संबंधित आरोपींना शिक्षा होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment