सोलापुरात आजपासून 23 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू


सोलापूर : राज्यासोबतच सोलापूर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे वाढता प्रादुर्भाव पाहता तीन दिवसांचा कर्फ्यू लागू करण्यात आला असून यासंदर्भातील आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. 20 एप्रिल 2020 रोजी दुपारी 2 पासून 23 एप्रिल रात्री 12 पर्यंत सोलापूरमध्ये संचार बंदी असेल. जीवनावश्यक सेवा, मेडिकल आणि दूध वगळता सर्व दुकाने याकाळात बंद राहणार आहे. त्याचबरोबर किराणा, भाजीपाला, फळे यांची विक्री होणार नाही. दरम्याम या आदेशाचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्यांची सोलापूर शहरामधील संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सोलापूर शहरामध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करुन शहराच्या सर्व हद्दी बंद करणे आवश्यक असल्यामुळे 20 एप्रिल 2020 दुपारी 2 पासून 23 एप्रिल 2020 रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करुन शहरातील सर्व दुकाने आणि शहराच्या सर्व हद्दी बंद करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान शहरात दुपारी दोन वाजल्यापासून कर्फ्यू लागू होणार असल्याचे कळताच खरेदीसाठी सकाळपासूनच काही ठिकाणी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केल्याचे समोर आले आहे. पुढील तीन दिवस संचारबंदी असल्याने भाजी, किराणा इत्यादी वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. पण कोणत्याही प्रकारची गर्दी कुठेही करु नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment