अमेरिकेने भारतासह 10 देशांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या केल्या – ट्रम्प

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या महामारीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून, येथे कोरोनाग्रस्त आणि यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे.

मात्र अमेरिकेने भारतासह 10 देशांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना चाचणी केल्याचे, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले की, कोरोना विरुद्धच्या लढाईत आम्ही हळूहळू प्रगती करत आहोत. आतापर्यंत 4.10 मिलियन लोकांची चाचणी करण्यात आली असून, हा जगभरातील एक विक्रमच आहे.

फ्रान्स, ब्रिटन, दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर, भारत, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, स्वीडन आणि कॅनडा या सर्व देशांनी मिळून जेवढ्या चाचण्या केल्या नाहीत, त्या पेक्षा अधिक अमेरिकेने केल्या असल्याचे, ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा 40 हजारांच्या पार गेला आहे.

ट्रम्प म्हणाले की, ही नक्कीच एक मोठी झेप आहे. सर्व काही विरुद्ध दिशेने सुरू असताना ही एक चांगली गोष्ट आहे. आपण नक्कीच चांगली कामगिरी करत आहोत. सियाटल, डेट्रॉईट, न्यू ऑर्लेन्स, इंडियानापोलिस आणि ह्युस्टन येथील परिस्थिती सुधारत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

ट्रम्प म्हणाले की, आक्रमण रणनीतीचा हा परिणाम आहे. अमेरिकेन नागरिकांच्या निस्वार्थीपणाचे मी आभार मानतो. लोक खूपच चांगले काम करत आहेत. आपण असंख्य लोकांचे प्राण वाचवत आहोत.

Leave a Comment