लॉकडाऊन : ई-कॉमर्स कंपन्यांना फक्त जीवनावश्यक वस्तू विकण्याची परवानगी

सरकारने कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी 20 एप्रिलनंतर काही सेवा आणि उद्योग-धंदे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ज्या भागात कोरोनाचा अधिक प्रभाव नाही, तेथे या सेवा सुरू होतील. सरकारने या संदर्भात नियमावली आणि सेवांची यादी देखील दिली आहे. कोरोनाचा प्रसार अधिक असणाऱ्या भागांमध्ये मात्र या सेवांना सूट देण्यात आलेली नाही.

याव्यतिरिक्त गृह मंत्रालयाने नियमावलीमध्ये बदल करत स्पष्ट केले की लॉकडाऊन दरम्यान ई-कॉमर्स कंपन्या जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य सामानांची विक्री, वितरण करू शकत नाही.

केंद्र सरकारने आरोग्य सेवा, कृषि, मासेमारी, वृक्षारोपण (जास्तीत जास्त 50 कामगार) आणि पशुसंवर्धनला परवानगी दिली आहे. सोबतच 50 कामगारांसह चहा, कॉफी आणि रबरच्या बागेत काम करण्याची परवानगी असेल.

याशिवाय मनरेगा अंतर्गत येणाऱ्या कामांना परवानगी असेल. मात्र सोशल डिस्टेंसिंग पाळणे आणि मास्क घालणे बंधनकारक आहे. वीज, पाणी, गॅस या सार्वजनिक सेवा सुरू राहतील. राज्यांतर्गत वाहतुकीला परवानगी असेल. केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालय देखील 20 एप्रिलपासून सुरू होतील.

या यादीत अर्थ आणि सामाजिक सेवा, प्रिंट आणि इलेट्रॉनिक मीडिया, छोटे लॉज यांना देखील ठेवण्यात आले आहे. मात्र या सर्वांना नियमावलीचे पालन करणे अनिवार्य आहे.

Leave a Comment