आपले ‘शौक’ पूर्ण करण्यासाठी काही लोक करत आहेत पोलीस हेल्पलाइनचा वापर


नवी दिल्ली – देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्यामध्ये लॉकडाऊन दरम्यामन नागरिकांच्या समस्यांचे निवारण किंवा अत्यावश्यक मदतीसाठी विविध राज्यातील सरकारने विशिष्ट हेल्पलाईन सुरु केली आहे. त्यातच उत्तर प्रदेशमधील सरकारने सुरू केलेल्या ‘हेल्पलाइन’चा अत्यावश्यक वस्तूंसाठी उपयोग होत आहेच, पण आपले ‘शौक’ पूर्ण करण्यासाठी काही लोक या क्रमांकावर मागण्या करत असल्याचेही प्रकार घडत आहेत. काही घाबरलेल्या नागरिकांचे औषधांसाठी हेल्पलाइन नंबरवर फोन येत आहेत. तर रसगुल्ला, समोसा एवढेच नाहीतर पान, गुटख्याची मागणी करणारे फोन कॉल्स या हेल्पलाइनवर येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

औषधांसारख्या आवश्यक वस्तूंसाठी गरजू लोकांचे १०७६ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन येतात, पण काहीजण रसगुल्ला, समोसा अशा पदार्थाची आणि काहीजण तर पान व गुटख्यासारख्या वस्तूंचीही मागणी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एक विचित्र कॉल उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर आला. रसगुल्ल्यांसाठी एका वयोवृद्ध व्यक्तीने तातडीची विनंती केली. फोन घेणाऱ्या पोलिसाला ही चेष्टा असावी असे वाटले. पण लखनऊच्या हजरतंगज भागात हे रसगुल्ले एका स्वयंसेवकाने नेऊन दिले, तेव्हा ८० वर्षांच्या एका इसमाला खरोखरच त्यांची गरज होती असे लक्षात आले. तो मधुमेहाचा रुग्ण होता आणि त्याची रक्तातील शर्करेची पातळी अतिशय कमी झाली होती.

राम रतन पाल यांनी मुख्यमंत्री हेल्पलाइन नंबर १०७६ वर फोन केला. त्यांना उच्च रक्तदाबाचा आजार आहे. पण औषधे संपल्याने ते अतिशय घाबरलेले होते. यावेळी आम्ही नियंत्रण कक्षातून तातडीने पावले उचलून लखनऊमध्ये त्यांच्या घरी औषधे पोहोचवली. गौतम बु्द्ध नगरमधील शंकर सिंग यांनी आवश्यक अन्नधान्यची मागणी केली होती. त्यांनाही ती घरपोच देण्यात आली. सीएम हेल्पलाइनवर असे अनेक फोन कॉल्स येत आहेत. अशी आम्ही जवळपास १ लाख नागरिकांना मदत केली असून पोलीस रिस्पॉन्स व्हेइकल (PVRs)चा उपयोग करण्यात येत आहे. यासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आल्याचे त्या अधिकाऱ्यांने सांगितले.

पण या हेल्पलाईनवर काही मागण्या अशा तातडीच्या नसल्याचेही आढळले आहे. काही लोकांनी या हेल्पलाईनच्या माध्यमातून पान, गुटखा आणि समोसा (चटणीसह) अशा वस्तूंचीही मागणी केली. समोसे खरोखरच नेऊन देण्यात आले, पण हा कॉल करणाऱ्या व्यक्तीला त्यांची किंमत मोजावी लागली, त्या व्यक्तीला शिक्षा म्हणून गटार साफ करण्यास सांगण्यात आले. काही जणांनी फोन करून दारूचीही मागणी केल्याचे प्रकार घडले आहेत.

Leave a Comment