अरुणाचल आणि गोव्यानंतर मणिपूर कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर


इन्फाळ : जगभरासह आपल्या देशभरात कोरोनाचे तांडव कायम असतानाच दुसरीकडे देशातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोरोनामुक्त होण्यात देशातील काही परिसरांना यश मिळत आहे. अरुणाचल, गोव्यानंतर आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने मणिपूरही वाटचाल करत आहे. मणिपूरमध्ये दुसरा रुग्णही चाचणीनंतर निगेटिव्ह आला आहे. 65 वर्षांच्या रुग्णावर कोरोनाचे रिम्समध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावरील उपचारानंतर तिसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

31 मार्च रोजी मणिपुरातील रिम्स रुग्णालयात 65 वर्षीय वृद्धाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हा रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातच्या कार्याक्रमासाठी उपस्थित होता. मणिपूरमध्ये कोरोनाचे दोनच रुग्ण सापडले होते. याआधी पहिल्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला होता. तर शनिवारी दुसऱ्या रुग्णाची तिसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. देशातील काही भाग कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 हजार 365 वर पोहोचला आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत 3,54,969 लोकांच्या 3,72,123 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 16, 365 नमुन्यांचचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Leave a Comment