जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाख पार; तर मृतांचा आकडा 1.45 लाख पार


नवी दिल्ली : जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या आणि या जीवघेण्या रोगामुळे झालेल्या मृतांच्या आखड्यात झपाट्याने वाढ होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत 21 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा 1.45 लाखांवर पोहोचला आहे. तर संपूर्ण जगात 5 लाखांहून अधिक नागरिक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

24 तासांमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेले देश

कोरोना व्हायरसमुळे जगभरात दररोज नवीन बदल पाहायला मिळत आहेत. अमेरिकेमधील न्यूयॉर्कमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याची माहिती न्यूयॉर्कच्या गव्हर्नरांनी दिली. त्यांनी याआधी न्यूयॉर्क शहरामध्ये सर्वांना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते. दरम्यान, न्यूयॉर्क शहर अमेरिकेतील कोरोनाचे केंद्र बनले आहे.

त्याचबरोबर ब्रिटनमधील लॉकडाऊन 3 आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. याबाबतची घोषणा ब्रिटनचे विदेश सचिव डॉमनिक राब यांनी डाउनिंग स्ट्रीट येथून केली. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन कोरोनामुक्त झाले असून ते सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आराम करत असल्यामुळे डॉमनिक राब यांनी यासंदर्भात घोषणा केली. तसेच यासंदर्भात बोलताना त्यांनी, कोरोनाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी लॉकडाऊन वाढवणं अत्यंत आवश्यक असल्याचं सांगितलं.

ब्राझीलमधील आरोग्यमंत्र्यांची राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी हकालपट्टी केली आह. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी घालण्यात आलेल्या नियमावलीवरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. दरम्यान राष्ट्रपती जायर बोल्सोनारो आणि आरोग्यमंत्री लुईज हेनरिक मॅन्डेटा यांच्यातील मतभेद सार्वजनिक रित्याही पाहायला मिळाले होते. ब्राझीलचे आरोग्यमंत्री सतत सोशल डिस्टंन्सिंग आणि आयसोलेशन महत्त्वाचे असल्याचे सांगत होते. तर राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी ब्राझीलची अर्थव्यवस्था जास्त महत्त्वाची असल्याचे सांगितले होते.

Leave a Comment