मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत जमा झाले 247 कोटी रुपये


मुंबई : आज फक्त कोरोना व्हायरस या एकाच शत्रुचा राज्य, देश आणि जग सामना करत आहे. विविध क्षेत्रातील, विविध स्तरातील लोक राज्य तसेच केंद्र सरकारला कोरोना या जीवघेण्या रोगाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदत करत आहेत. याचाच परिणाम म्हणून आतापर्यंत 247 कोटी रुपये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा झाले आहेत. गुरुवारी (16 एप्रिल) मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक कोटी रुपयांची मदत एलआयसी गोल्डन जुबली फाऊंडेशनने केली आणि त्यामुळे निधीमधील जमा रक्कम 247 कोटींवर पोहोचल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसविरद्धच्या लढाईसाठी नागरिकांनी साथ देण्याचं आणि आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. शक्य तेवढी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये करा जेणेकरुन ही लढाई सोपी होईल. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर मोठ्या संख्येने मदतीचे हात समोर आले. विद्यार्थी, तरुण वर्ग, वयोवृद्ध, खेळाडू, कलाकार, उद्योजक आणि मोठमोठ्या कंपन्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक योगदान दिले आहे.

28 मार्च रोजी मुख्यमंत्री कोविड – 19 सहाय्यता निधी मागील महिन्यात उघडण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक प्रकारची मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर जवळपास 18-19 दिवसांत 247 कोटी रुपये जमा झाले आहेत.


यानंतर मदतीला सर्वसामान्यांपासून विविध क्षेत्रातील दिग्गज सरसावले. एका चिमुकलीने आपल्या पिगी बँक रिकामी केली, तर पुण्यातील कचरावेचक महिने आपली जमापुंजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केली. कोणी आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च टाळून मदत केली तर कोणी आईच्या उत्तरकार्याचा खर्च टाळून सहाय्यता निधीत योगदान दिले आहे.

Leave a Comment