
मुंबई : अनेक स्पर्धा परीक्षा या राज्यासह देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एमपीएससीच्या अनेक विद्यार्थ्यांसाठी यंदाचे वर्ष ही शेवटची संधी होती. याच वर्षी त्यांच्या वयाची मर्यादा संपत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आशा मावळल्या होत्या. पण राज्य सरकारने अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत १ वर्षाची वाढ
स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून लाखो उमेदवार एमपीएससीची परीक्षा देतात. कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा यावर्षी पुढे ढकलण्यात आल्या. या वर्षी ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपत होती अशा उमेदवारांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून त्यांना १ वर्ष वाढवून दिले जाईल, असं आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. युपीएससीच्या विद्यार्थ्यांनाही अशीच सवलत मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अनेकांच्या करियरला कोरोनाची बाधा झाल्यासारखे झाले होते. पण या उमेदवारांना दिलासा देणारे आश्वासन सरकारने दिल्यामुळे हजारो उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे.
