महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३२०२ वर


मुंबई – महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या असून काल महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी तीन हजारांच्या पुढे गेली. महाराष्ट्र तीन हजारापेक्षा जास्त रुग्ण असणारे पहिलेच राज्य ठरले आहे. त्याचबरोबर मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन हजारांच्या पुढे गेला आहे. मुंबईत गुरुवारी १७७ नव्या रुग्णांची भर पडली. राज्य सरकारने कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचे प्रमाण कमी झाले असून रुग्ण उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगितले आहे.

राज्यात गुरुवारी २८६ कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने संख्या ३२०२ वर पोहोचली आहे. तर सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९४ झाली आहे. मृतांमधील चार जण मुंबई आणि तिघे पुण्यातील होते. यामधील चार रुग्णाचे वय ६० च्या पुढे होते, तर इतर जण ४० च्या पुढचे होते. यामधील सहा जणांना अस्थमा, उच्च रक्तदाब, डायबेटिस सारखे त्रास होते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान राज्यातील सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या मुंबईतही रुग्णांची संख्या २०६३ झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सार्वजनिक आणि खासगी ठिकाणांवर ५६ हजार ६७३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामधील ५२७६२ लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. महाराष्ट्रात सध्या २९७ सक्रीय कंटेनमेंट झोन आहेत. डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या एकूण ५६६४ सर्व्हे टीम असून आतापर्यंत २० लाख लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. उपचारानंतर तीन हजार लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण ७१,०७६ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची आहे. तर राज्यातील एकूण रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. तर त्या पाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. पण, मुंबई पुण्याबरोबरच केंद्र सरकारने राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई उपनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत करण्यात आलेला आहे.

Leave a Comment