नायजेरिया : लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांचे पोलिसांकडून एन्काऊंटर


नायजेरिया – जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आला असून त्याची पद्धतशीरपणे अंमलबजावणी केली जात आहे. पण काही ठिकाणी लॉकडाऊनची पायमल्ली करणाऱ्यांसाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नायजेरियातही सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. पण तेथील पोलिसांनी १८ जणांचे नियमांचे उल्लंघन केले म्हणनू एन्काऊंटर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे देशात मृत्यू झालेल्यांपेक्षाही जास्त हा आकडा असल्याचे मानवाधिकार आयोगाने सांगितले आहे.

या हत्यांची माहिती आपल्याकडे लोकांनी फोन करुन तसेच व्हिडीओ पाठवून दिली असल्याचे मानवाधिकार आयोगाने सांगितले आहे. नायजेरियात ३० मार्चपासून लॉकडाउन सुरु झाल्यापासून पोलिसांनी १८ जणांची हत्या केली आहे. तर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे देशात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियात कोरोनाचे एकूण ४०७ रुग्ण आढळले असून व्हायरस अजून वेगाने पसरण्याची भीती आहे. नायजेरियन पोलिसांची प्रतिमा क्रूर अशीच मलिन आहे. काऊन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्सने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक वर्षात संपूर्ण देशभरात १४७६ जणांची हत्या करण्यात आली आहे.

आपल्या अहवालात मानवाधिकार आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, १८ जणांची आठ वेगवेगळ्या घटनांमध्ये हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. आपल्याला ३६ पैकी ४२ राज्यांमधून जवळपास १०० तक्रारी आल्याचे आयोगाने सांगितले आहे. मानवाधिकार आयोगाच्या अहवालावर अद्याप सुरक्षा दलाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Leave a Comment