परदेशी आर्थिक मदत लपवल्याप्रकरणी मौलाना साद यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल


नवी दिल्ली – पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाकडून तबलिगी जमात मरकजचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मौलाना साद यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीकडून काही तासातच हा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परदेशातून मोठ्या प्रमाणात मौलाना साद यांच्या संस्थेला आर्थिक मदत मिळत असून सरकारला त्याची कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा सक्तवसुली संचालनालयाला संशय आहे. मौलाना साद यांच्या आठ सहकाऱ्यांविरोधातही सक्तवसुली संचलनालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इडीकडून मरकजच्या सर्व खात्यांची छाननी केली जात असून मरकजला मिळालेला निधी मनी लॉण्ड्रिंगचा भाग होता की हवाला चॅनेल्सचा वापर करण्यात आला याचा तपास देखील सक्तवसुली संचलनालय करत आहेत. दरम्यान आयकर विभागदेखील जाहीर न केलेले उत्पन्न, विश्वस्तांकडून आयकर चोरीचा प्रयत्न आणि निधीचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करण्यात आला का ? याचा तपास करणार आहे.

मरकजच्या फंडिंगबाबतचा अहवाल दिल्ली पोलीस क्राइम ब्रांच सक्तवसुली संचलनालय आणि आयकर विभागाकडे सोपवणार आहे. अद्याप चौकशीसाठी मौलाना साद क्राइम ब्रांचसमोर हजर झालेले नाहीत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, क्राइम ब्रांचचा अहवाल आणि मौलाना साद यांचा जबाब आर्थिक तपास यंत्रणांकडून वापरला जाणार आहे. गेल्या काही दिवसांत मौलाना साद यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले असल्याचे लक्षात आले आहे. मरकजला दोन वेळा नोटीस पाठवूनदेखील अद्यापही त्यांनी बँक खात्यांची माहिती शेअर केलेली नाही. मौलाना साद यांची क्वारंटाइन वेळ संपली असून क्राइम ब्रांच लवकरच त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यानंतर पोलीस अटकेसंबंधी निर्णय घेणार आहे.

Leave a Comment