रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमधील कपातीसह अनेक महत्वाच्या घोषणा


मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या घोषणा केल्या असून त्यात रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली असून रेपो रेट 25 बेसिस पॉईंटने कमी करण्यात आला आहे. हा रेपो रेट आता 4 वरून 3.75 वर आला आहे. त्याचबरोबर शक्तिकांत दास म्हणाले की, कोरोनामुळे जगभरातील बाजार कोसळल्यामुळे संपूर्ण जगावर मंदीचं सावट आहे. संपूर्ण विश्वाची अर्थव्यवस्था सध्याच्या घडीला वाईट स्थितीत आहे. त्यातच आरबीआयचा मंदीच्या संकटाशी लढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. सध्या कोरोना व्हायरसचे मानवतेसमोर संकट आहे. या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे दास यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

शक्तिकांत दास यावेळी म्हणाले, जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत आहे. जगामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये चांगली स्थिती आहे. यावर्षी 1.9 टक्के विकास दर राहण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर विकास दर 7.2 टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो.

शक्तिकांत दास यांनी यावेळी काही महत्वाच्या घोषणा केल्या. 50 हजार कोटींची मदत मायक्रो बँकिंग क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आली आहे. आरबीआयने नाबार्डला 25 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. छोट्या आणि मध्यम उद्योगांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. रिव्हर्स रेपो रेट 25 बेसिक पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता रिव्हर्स रेपो रेट 3.75 टक्के असेल.

एकूण 50 हजार कोटींची मदत मायक्रो बँकिंग क्षेत्रासाठी घोषित केली आहे. यातील 15 हजार कोटी रुपये भारतीय लघू उद्योग विकास बँकेला देण्यात येत आहेत. हे पैसे कर्जाच्या पुर्नगठनासाठी देण्यात येत आहेत. एनएचबीसाठी 10 हजार कोटी आणि नाबार्डला 25 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ते पुढे म्हणाले की, जगभरातील अर्थव्यवस्थांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. देशात नवीन छापलेले चलन आरबीआय आणत आहे. कोरोनामुळे निर्यात घटली आहे. तसेच वीजेची मागणीही कमी झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये विक्री घटली आहे. बाजारात चलनाची कमतरता भासू न देणे. बाजारांचे कामकाज प्रभावित न होऊ देणे हे लक्ष समोर ठेवण्यात आले आहे. आपला डेटा सांगतो की, इंटरनेट बँकिंगद्वारे चांगले काम होत आहे. अडचणींमध्येही एटीएमद्वारे चांगले काम होत आहे. जागतिक मंदीच्या संकटात भारताचा विकास दर सकारात्मक राहणार असून 1.9 टक्के राहिल असा अंदाज दास यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment