ही स्मार्ट रिंग कोरोनाची लक्षण दिसण्याआधीच देणार संक्रमणाची माहिती

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या आजारावर अद्याप औषध नसले तरी सोशल डिस्टेंसिंग, लॉकडाऊनद्वारे व्हायरस अधिक प्रमाणात पसरणार नाही याची काळजी घेतली जात आहे. व्हायरसची लक्षण जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली जात आहे. याच पार्श्वभुमीवर वैज्ञानिक आणि डॉक्टरांच्या टीमने एक स्मार्ट रिंग (अंगठी) तयार केली आहे, जी लक्षण दिसण्याआधीच कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत माहिती देते.

स्मार्ट रिंगबाबत माहिती देताना वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठ मेडिसिनमध्ये न्यूरो सर्जन आणि डब्ल्यूव्हीयू रॉकफेलर न्यूरोसाइन्स संस्थेचे प्रमुख डॉक्टर अली रेजाई यांनी सांगितले की, कोरोनाद्वारे संक्रमित होण्याची सर्वाधिक धोका डॉक्टर्स, पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आहे. अनेकदा त्यांना संक्रमण झाल्याची माहिती मिळत नाही. अशावेळी ही स्मार्ट रिंग फायदेशीर ठरेल. या स्मार्ट रिंगला घातल्यानंतर मोबाईल अ‍ॅपशी कनेक्ट करावे लागेल. यानंतर दररोज सकाळी 5 मिनिटे अ‍ॅपवर एक गेम खेळावा लागेल. यात कोरोनासंबंधी प्रश्न विचारले जातील.

या रिंगला बनविण्यासाठी व्हियरेबल प्रोडक्ट बनवणारी कंपनी ओरा हेल्थसोबत भागीदारी केली. ही स्मार्ट रिंग लोकांच्या शरीराचे तापमान, झोपण्याचा पॅटर्न आणि ह्रदयाच्या गतीवर लक्ष ठेवत डेटा रेकॉर्ड करते. ही रिंग आर्टिफिशियल इंटेलिजेंस सपोर्ट करते. रिंगमधील एआयला हजारो युजर्सच्या डेटासोबत ड्रेंड करण्यात आलेले आहे. स्मार्ट रिंगचे टेस्टिंग सध्या हजार डॉक्टर्स, नर्स आणि हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होत आहेत. या रिंगचे नाव ऑरो रिंग आहे.

डॉक्टर रेजाई यांनी सांगितले की, ही रिंग कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षण दिसण्याच्या 24 तास आधी माहिती देईल. लक्षण आधीच दिसल्याने लवकर उपचार घेण्यास मदत होते.

Leave a Comment