तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना सादसह इतरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल


नवी दिल्ली – दिल्लीसह संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढावणाऱ्या तबलिगी जमातीच्या सदस्यांवर सध्या कारवाई बडगा उगारला जात आहे. त्यातच आता जमातचे प्रमुख अमीर मौलाना मोहम्मद साद यांच्यासह अनेकांवर दिल्ली पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर व्हिसा नियमांचे उल्लंघन करणार्‍या जमातीच्या 1900 लोकांविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस बजावली आहे. मौलाना साद यांच्यासह 17 जणांना दिल्ली पोलिसांकडून चौकशीत सहभागी होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. पण यापैकी 11 जणांनी कोरोना व्हायरसमुळे स्वतःला वेगळे ठेवले असल्याचे सांगून पोलिसांसमोर येण्यास टाळले आहे.

त्यातच आपण स्वत: ला वेगळे ठेवले असल्याचे मौलाना साद यांनीही सांगितले आहे. पण आता त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपत आला असून, त्यांना पोलीस केव्हाही अटक करू शकतात अशी शक्यता वर्तवली गेली आहे. निजामुद्दीनस्थित असलेल्या तबलिगी जमातच्या मरकजचे कोरोना व्हायरस कनेक्शन समोर आल्यानंतर पोलिसांनी मौलाना सादसह सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा साथीचा कायदा आणि आयपीसीच्या अनेक कलमांतर्गत दाखल करण्यात आला. पोलिसांनी चौकशीनंतर आता या प्रकरणात कलम 304 (हेतुपुरस्सर) हत्या ही जोडली आहे. या कलमान्वये आता मौलाना साद यांना किमान दहा वर्षे किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

त्यायचबरोबर जमातच्या मरकजमध्ये सामील झालेल्या 1900 परदेशी नागरिकांविरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली आहे. याबाबत पोलिसांचे असे म्हणणे आहे की व्हिसा नियमांचे या लोकांनी उल्लंघन केले आणि कार्यक्रमास हजेरी लावली. पोलिसांनी मरकज येथून 500 हून अधिक परदेशी लोकांसह 2300 हून अधिक लोकांना बाहेर काढले होते.

Leave a Comment