महाराष्ट्राची चिंता वाढली; कोरोनाग्रस्तांची संख्या 3 हजारच्या टप्प्यात


मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २८०१ वर पोहचली आहे. त्यातच आज दिवसभरात या रुग्णांमध्ये नव्या ११७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. या ११७ कोरोनाग्रस्तांपैकी १०० रुग्ण हे मुंबई-पुण्यातील आहेत. ११७ पैकी ६६ रुग्ण मुंबईतील तर ४४ रुग्ण पुण्यातील असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिली आहे. देशभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित आहेत. त्यातच आज ११७ रुग्णांची वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २८०१ एवढी झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या संकटाशी शासकीय यंत्रणा, पोलीस, डॉक्टर, आरोग्य अधिकारी हे सगळेच जण सामना करत आहेत. पण कोरोनाग्रस्तांची महाराष्ट्रातील संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. ३ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनीही १४ एप्रिलला या दरम्यान कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.

विशेष कृती आराखडा मुंबईतील धारावीत रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी तयार करण्यात आला आहे. सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काहीही विचित्र महाराष्ट्रात घडत नाही याबद्दल खात्री बाळगा असेही काल झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच एकजुटीने कोरोनाचा सामना करु आणि ही लढाई आपण जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment