तळीराम गुगलवर शोधत आहेत घऱाच्या घरी दारु बनविण्याची कृती


मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील जनतेशी संवाद साधताना देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये 3 मेपर्यंत वाढ केली. पण यामुळे तळीरामांची फार मोठी पंचाईत झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद असल्यामुळे दारुची दुकाने देखील बंद आहेत. जर कुठे अवैधरित्या दारुची विक्री होत असेल, तर त्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागत असल्यामुळे तळीरामांना त्यांची तहान भागवणे कठीण होऊन बसल्यामुळे दारु मिळवण्यासाठी अनेकांनी वेगवेळ्या युक्त्या शोधण्यास सुरुवात केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात गुगलवर सध्या सर्वात जास्त घरात दारु कशी बनवावी? हे सर्च केले जात आहे. गुगल ट्रेंडनुसार, लोकांनी 22 ते 28 मार्चदरम्यान गुगलवर घरात दारु कशी बनवता येईल, सर्वाधिक सर्च केले. यासंदर्भात एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या मते मार्चच्या शेवट-शेवट ग्रे-मार्केटमध्ये दारु दुप्पट किंमतीला विकली जात होती. जेव्हा अवैध विक्री थांबवण्यासाठी दारुच्या दुकानांना सील करण्यात आले, तेव्हा दारुच्या किंमती आणखी वाढल्या.

तळीराम सध्या बंद असेलेली दारुची दुकाने फोडून दारु चोरत आहेत, तर कुठे नशेसाठी सॅनिटायझरचाही वापर केला जात असल्याचेही पुढे आले आहे. देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 हजारांच्या पार केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा काळ 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता तळीरामांच्या समस्या आणखी वाढणार आहेत.

Leave a Comment