कोरोना : 2022 पर्यंत सोशल डिस्टेंसिंगची गरज, वैज्ञानिकांचा ईशारा

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता जगभरातील देशांना लॉकडाऊन करावे लागत आहे. भारतातही सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल डिस्टेंसिंग आणि लॉकडाऊनचे नियम देखील कठोर करण्यात आले आहेत.  मात्र वैज्ञानिकांनुसार, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी 2022 पर्यंत सोशल डिस्टेंसिंग पाळणे गरजेचे आहे. येणाऱ्या वर्षात कोरोना व्हायरस पुन्हा थैमान घालू शकतो.

जर्नल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, केवळ एकदा लॉकडाऊन केल्याने महामारीवर नियंत्रण मिळवणे अशक्य आहे. नियमांशिवाय कोरोना व्हायरसचा दुसरा टप्पा भयानक ठरू शकतो.

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे महामारी विशेषज्ञ आणि या संशोधनाचे लेखक मार्क लिपिसच म्हणाले की, दोन गोष्टीमुळे संसर्ग पसरतो – एक संक्रमित व्यक्ती आणि दुसरे कमजोर रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या लोकांमुळे. जगातील बहुतेक लोकसंख्येमध्ये व्हायरसविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित होईपर्यंत मोठी लोकसंख्या या व्हायरसच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे.

लस अथवा उपचार न शोधल्यास 2025 मध्ये कोरोना व्हायरस पुन्हा जगात पसरू शकतो. मार्क यांच्यानुसार, सध्याची कोरोना व्हायरसच्या संसर्गाची स्थिती पाहता 2020 च्या उन्हाळ्यापर्यंत महामारीचा अंत झाल्याची भविष्यवाणी करणे योग्य नाही.

ब्रिटनच्या वैज्ञानिक सल्लागार समितीने देखील सुचवले होते की रुग्ण वाढू नये याची काळजी घेण्यासाठी दीर्घकाळ सोशल डिस्टेंसिंग पाळणे गरजेचे आहे. देशात जवळपास 1 वर्ष कधी कठोर नियम तर कधी सुट असे करत सोशल डिस्टेंसिंग पाळणे गरजेचे आहे.

संशोधनानुसार, नवीन उपचार, लस आणि आरोग्य सुविधा चांगल्या असल्यास सोशल डिस्टेंसिंग पाळणे अनिवार्य नसेल. मात्र तसे झाले नाहीतर 2022 पर्यंत सर्व्हिलांस आणि फिजिकल डिस्टेंसिंग पाळावे लागू शकते.

जर लोकांची प्रतिकारशक्ती कायमस्वरूपी झाली तर कोरोना विषाणू पाच वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी नाहीसा होईल. जर लोकांची प्रतिकारशक्ती केवळ एका वर्षासाठी कायम राहिली तर कोरोना व्हायरस इतर व्हायरसप्रमाणे दरवर्षी उद्भवेल.

मार्क यांच्यानुसार, व्हायरसवर पुर्णपणे मात करण्यासाठी अनेक वर्ष लागतील. केवळ एकदा लॉकडाऊन करून कोरोना संक्रमण नष्ट करणे शक्य नाही. निर्बंध उठताच कोरोना व्हायरसचे संक्रमण परत वाढेल.

Leave a Comment