बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आयपीएल


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरु असलेला लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला असून सध्या कोरोनामुळे देशभरातील परिस्थिती आणि वाढलेले लॉकडाउन लक्षात घेता तेराव्या हंगामाची आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. २९ मार्चपासून सुरु होणारी ही स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती. पण आता ही स्पर्धा एप्रिल-मे महिन्याच्या काळात खेळवली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील वृत्त क्रिडा विषयक ईएसपीएनक्रिकइन्फो या संकेतस्थळाने दिले आहे.

स्पर्धेतील सहभाग सर्व संघमालकांना आयपीएलचे हेमांग अमिन यांनी यासंदर्भातली कल्पना दिलेली आहे. लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे आताच्या घडीला आयपीएलचे आयोजन एप्रिल-मे महिन्यात करणे शक्य नसल्याचे अमिन यांनी सर्व संघमालकांना कळवले आहे. मध्यंतरी सप्टेंबर महिन्यात होणारी आशिया चषक स्पर्धा पुढे ढकलून त्या जागेवर आयपीएल खेळवण्याच्या विचारात बीसीसीआय होती, पण आयपीएलसाठी आशिया चषक रद्द करण्यास पीसीबी अध्यक्ष एहसान मणी यांनी नकार दिला आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच कॉन्फरन्स कॉलवर एक बैठक पार पडली. ज्यात अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा, आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, खजिनदार अरुण धुमाळ हे उपस्थित होते. या बैठकीतच स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Leave a Comment