देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढला, मोदींनी केले शिक्कामोर्तब


मुंबई – कोरोनाचा देशभरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आज सकाळी देशातील नागरिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, अद्यापही कोरोनाला रोखण्यात म्हणावे तसे यश आलेले नाही. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी त्यासंबधी चर्चा करण्यात आली असून त्या चर्चेदरम्यान काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला दिला होता. त्यानंतर देशभरातील अनेक राज्यांनी आधीच लॉकडाऊन वाढवण्याचा घेतला आहे. त्या सर्व सूचना लक्षात घेता देशभरातील लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले.

दरम्यान भारताला कोरोनापासून होणारे नुकसान खूपच कमी ठेवण्यात यश मिळाले आहे. भारतीयांनी शिस्तबद्धतेने आपल्या कर्तव्याचे पालन केले आहे. त्यातच अनेक नागरिकांना खूप त्रास भोगावा लागला. प्रत्येकजण एखाद्या सैनिकाप्रमाणे कर्तव्य पार पाडत आहेत. हीच बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली की प्रत्येकजण आपले कर्तव्य पार पाडत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात या काळात विविध उत्सव असतात. लॉकडाउनच्या काळात अनेक राज्यांमध्ये नववर्षाचे स्वागत झाले, परंतु नियमांचे संयमाने लोकांनी पालन केले. घरात राहून उत्सव लोकांनी साजरे केले ही गोष्ट प्रेरणादायी प्रशंसापूर्ण असल्याचा उल्लेख नरेंद्र मोदींनी आवर्जुन केला.

जगभरातील कोरोनाची भयावह स्थिती सगळ्यांनाच आता माहिती आहे. भारताने अन्य देशांच्या तुलनेत कोरोनाला रोखण्याचा कसा प्रयत्न केला याचे आपण साक्षीदार आहात. भारतात कोरोनाचे १०० रुग्ण होण्याच्या आधीच भारताने विदेशी नागरिकांसाठी १४ दिवसांचे विलगीकरण केले. फक्त ५५० कोरोनाचे बाधित भारतात होते तेव्हाच भारताने २१ दिवसांचा लॉकडाउन केला. समस्या वाढण्याची वाट न बघता भारताने जेव्हा समस्या दिसली तेव्हाच निर्णय घेऊन ती समस्या थांबवण्याचा प्रयत्न केला. हे असे संकट आहे की तुलना योग्य नाही, पण वास्तव हे आहे की जगातील बड्या देशांचे आकडे बघितले तर लक्षात येते की भारत खूपच चांगल्या स्थितीत असल्याचे नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटले.

जे देश महिन्यापूर्वी भारताच्या बरोबरीत होते, त्या देशांमध्ये भारतापेक्षा २५-३० टक्के जास्त बाधित झाले आहेत, हजारो लोकांचा बळी देखील गेला आहे. योग्य वेळी चांगले निर्णय भारताने घेतले नसते तर भारताची स्थिती काय असती याचा विचार करवत नाही. परंतु या अनुभवातून हे स्पष्ट झाले आहे की जो रस्ता आपण निवडला तोच बरोबर आहे. सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाउनचा खूप फायदा झाला आहे. फक्त आर्थिक बाजू बघितले तर खूप महाग पडल्याचे दिसू शकते, खूप किंमत चुकवायला लागली, परंतु जीवितापेक्षा मोठे काही नसल्याचे नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटले.

भारताने कमी स्त्रोत असताना, जो मार्ग निवडला त्याची जगभरात चर्चा होणे स्वाभाविक आहे. देशातील राज्यांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अत्यंत चांगले काम केले आहे. या सगळ्या प्रयत्नांनंतरही कोरोना ज्याप्रकारे जसा पसरत आहे. त्याने सगळ्यांना सतर्क केले आहे. भारतात पण कोरोनाच्या विरोधात आता लढाई कशी करायची, विजयी कसे व्हायचे, नुकसान कमी कसे होईल, लोकांचे हाल कमी कसे होतील यावर राज्यांबरोबर चर्चा होत आहे. सगळेजण हाच पर्याय देतात की लॉकडाउन वाढवायला हवा. अनेक राज्यांनी लॉकडाउन आधीच वाढवला असल्याचे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.

Leave a Comment