चीनने मारली बाजी; कोरोना लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात


बिजिंग : जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला असून त्यावर तोड काढण्याचा जगभरातील सर्वच देश आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर अनेक संशोधक, डॉक्टर या व्हायरसवर प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. आता चीनने याच प्रयत्नांमध्ये बाजी मारल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भातील वृत्त नवभारत टाईम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार अतिशय महत्त्वपूर्ण अशा दुसऱ्या टप्प्यावर चीनच्या वतीने कोरोना लसीची ही चाचणी पोहोचली आहे. जवळपास ५०० स्वयंसेवकांची निवड या चाचणीसाठी करण्यात आली आहे. वुहान प्रांतातील एका ८४ वर्षीय नागरिकाचाही ज्यामध्ये समावेश आहे. कोरोनाचा जगभरात फैलाव चीनच्या वुहान प्रांतातूनच झाला होता. ज्यानंतर या जीवघेण्या व्हायरसचा विळखा आता जवळपास संपूर्ण जगाला बसला आहे.

PLA Major General Chen Wei यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत Institute of Biotechnology, Academy of Military Medical Sciences of China च्या संशोधन चमूचे लस शोधण्याचे काम सुरु आहे. संशोधकांनी या चाचणी प्रक्रियेत जेनेटीक इंजिनिअरिंग पद्धतीचा वापर केला. दरम्यान, लस चाचणीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच क्लिनिकल ट्रायलमध्ये सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आल्यानंतर आता लसीच्या कार्यक्षमतेची पडताळणी दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्याहून जास्त स्वयंसेवकांचा समावेश या टप्प्यात असणार आहे. क्लिनिकल ट्रायल मार्च महिन्यात पार केल्यानंतर आता मानवी चाचणीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला चीन हा आतापर्यंतचा पहिला देश असल्याचे कळते. त्यामुळे या टप्प्याच्या अंतिम अहवालाकडेच आता साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment