दिलासादायक : पंजाबमधील ‘त्या’ अधिकाऱ्याचा हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश


लुधियाना – काल पंजाबमधील निहंगा समुदायातील काही जणांनी कर्फ्यू पास मागितल्याने तसेच भाजी मंडईत जाण्यापासून रोखल्याने पोलिसांवर रविवारी हल्ला केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरजीत सिंह यांचा या हल्ल्ल्यात हात तलवारीने कापण्यात आला होता. त्यातच आता दिलासादायक बातमी आली आहे. डॉक्टरांना पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीने कापलेला हात पुन्हा जोडण्यात यश आले आहे. पोलीस अधिकाऱ्यावर डॉक्टरांकडून यशस्वी सर्जरी करण्यात आलेली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

हरजीत सिंह आपला कापलेला हात घेऊन दुचाकीवरुन रुग्णालयात पोहोचले होते. त्यांच्यावर सात तास सर्जरी केल्यानंतर डॉक्टरांना हात जोडण्यात यश मिळाले आहे. चंदिगडमधील पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ऍण्ड रिसर्च (पीजीआयएमईआर) रुग्णालयात यशस्वी सर्जरी झाल्याची माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

मला सांगण्यात आनंद होत आहे की, सहायय्क पोलीस निरीक्षक हरजीत सिंह यांचा हात साडे सात तासांच्या प्रदीर्घ सर्जरीनंतर जोडण्यात यश आले आहे. डॉक्टरांच्या सर्व टीम आणि सपोर्ट स्टाफचे मी आभार मानतो. त्यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी हरजीत सिंह यांना शुभेच्छा, असे ट्विट अमरिंदर सिंग यांनी केले आहे. डॉक्टरांसाठी ही सर्जरी प्रचंड आव्हानात्मक होती. सात तास चाललेल्या प्रदीर्घ प्लास्टिक सर्जरीनंतर डॉक्टरांना हात जोडण्यात यश मिळाले.

Leave a Comment