राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1982 वर, तर एकट्या मुंबईत 1298 रुग्ण


मुंबई – राज्यात रविवारी दिवसभरात 221 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1982 झाला आहे. काल राज्यात 22 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबरोबर कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 149 झाली आहे. काल झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईत 16, पुण्यातील 3 तर नवी मुंबईतील 2 आणि सोलापूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी 13 पुरुष तर 9 महिला आहेत. काल झालेल्या 22 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत तर १५ रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर एकजण 40 वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 22 पैकी 20 रुग्णांमध्ये (91 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरिया देखील होता.

कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 41 हजार 109 नमुन्यांपैकी 37 हजार 964 जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 1982 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 217 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 61 हजार 247 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 5064 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता, त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी 37 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, यवतमाळ येथे 7, बुलढाणा जिल्ह्यात 6, मुंबईत 3 तर प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत. तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर मनपा, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील 6 जण अहमदनगर येथे तर एक जण पिंपरी चिंचवड येथे कोरोना बाधित आढळले आहेत.

रुग्णांचे क्लस्टर राज्यातील ज्या भागात सापडले आहेत, त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. या प्रकारे राज्यात एकूण 4846 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 17.46 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एकाच घरातील त्यांच्या सहवासातील 26 जण कोरोनाबाधित आढळले होते. यातील 24 जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. इस्लामपुरातील या भागात 31 सर्वेक्षण पथकांनी मागील 2 आठवडे साडेसात हजाराहून अधिक लोकसंख्येचे नियमित सर्वेक्षण केले आहे.

Leave a Comment