पंजाब ; कर्फ्यू पास मागणाऱ्या पोलिसाचा तलवारीने कापला हात


पतियाळा – कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्र तसेच देशातील अनेक राज्य सरकारकडून लॉकडाउनची सक्तीने अमलबजावणी केली जात असल्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहेत. त्यातच असे करताना पोलिसांवर होणाऱ्या हल्लांमध्ये देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. पंजाबमध्येही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पतियाळातील भाजी मंडई परिसरात कर्फ्यू पास मागणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा लॉकडाउनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या निहंगा टोळक्याने तलवारीने हातच कापला. यात इतर दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.

महाराष्ट्राप्रमाणेच कोरोनामुळे पंजाबमधील स्थितीही गंभीर झाली असल्यामुळे गर्दी थांबवण्यासाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कायद्याची कडक भूमिका घेत अंमलबजावणी सुरू केली. पण, दुसरीकडे पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. पतियाळामध्ये निहंगा (परंपरेने शस्त्र ठेवण्याची अनुमती असलेले निळा गणवेश परिधान करणारे) टोळक्याने पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. एका पांढऱ्या गाडीतून निहंगांचा एक गट पतियाळातील भाजी मंडईमध्ये जात होते. यावेळी लॉकडाउन असल्याने बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कर्फ्यू पास दाखवण्याची मागणी केली. पण, निहंगांच्या गटाने गाडी थेट भाजी मंडईच्या रस्त्यावर असलेले बॅरिकेट्स तोडले आणि पुढे निघून गेले. पोलिसांनी यावेळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निहंगांच्या टोळक्याने पोलिसांवरच हल्ला केला. या हल्ल्यात टोळक्याने एका सहायक पोलीस निरीक्षकाचा तलवारीने हातच कापला. तर दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना रविवारी सकाळी घडली. या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव हरजित सिंह असे असून जवळच्या राजेंद्र हॉस्पिटलमध्ये हरजित सिंह यांना दाखल करण्यात आल्यानंतर चंदीगढ येथे त्यांना हलवण्यात आले. पतियाळाचे पोलीस उपअधीक्षक मनदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार हे टोळके हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरू फरार झाले. या टोळक्याचा पोलिसांनी पाठलाग केला. हे टोळके बलवाडा येथील एका गुरूद्वारात लपले होते. त्यानंतर या घटनेशी संबंध असलेल्या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हरजित सिंह यांच्यावर शस्त्रकिया करण्यात सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Comment