नाशिककरांच्या चिंतेत भर, २४ तासांत मालेगामध्ये आढळले १८ नवे रूग्ण


नाशिक – नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दररोज वाढ होत असल्यामुळे नाशिककरांच्या चिंतेत भर पडत आहे. मालेगावमधील पाच जणांचा रिपोर्ट रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आला होता त्यात भर म्हणून दुपारी १२ वाजता आणखी १३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दिवसभरात मालेगावात १८ नवे करोचे रूग्ण आढळले आहेत. आजच्या १८ नव्या रूग्णांमुळे मालेगावातील कोरोनाग्रस्तांची संख्या २७ झाली आहे. त्यापैकी मालेगावमधील एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात मालेगावमुळे वाढ झाली आहे. नाशिकमधील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३२ झाली आहे. नाशिक शहरात तीन, निफाड आणि चंदवडमध्ये प्रत्येकी एक-एक रूग्ण आढळला आहे. निफाडमधील एक रूग्ण पुर्णपणे बरा झाल्यामुळे त्याला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण मालेगावमधून सातत्याने आढळून येत आहे. मालेगावमधून मागील तीन दिवसांमध्ये २७ नवे रुग्ण समोर आल्याचे धक्कादायक चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण मालेगावमध्ये आहेत. रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे चार दिवस पूर्णतः लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मालेगावच्या नयापुरा भागातील २२ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला तीन दिवसांपूर्वी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मालेगाव हे उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचे केंद्रबिंदू ठरल्याचे चित्र आहे. या परिसरात अतिशय दाटीवाटीने नागरी वस्ती आहे. या भागात आतापर्यंत २७ कोरोनाग्रस्त आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. अहवाल सकारात्मक आलेल्यांमध्ये चांदवड येथील एकाचा समावेश आहे. नाशिक शहरात नव्याने दोन रुग्ण आढळून आल्याने नाशिककरांमध्येही अस्वस्थता आहे. ब्राझीलहून परतलेल्या आणि मुंब्रा येथे नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. संबंधितांचे अहवाल सकारात्मक आल्यामुळे रुग्णांची संख्या तीनवर पोहचली.

Leave a Comment